Tuesday, October 3, 2017

PART 24 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)




Part 24 (जस्ट इमॅजीन)

.
चालू महीण्याचे राहिलेले दिवस नेहमी प्रमाणे नित्यनेमाने संपून गेले..  असे दिवस पटापट नित्यक्रमाणे संपले की मला असं वाटतं की आपण वडाप चे ड्रायव्हर आहोत..  जसा ड्रायव्हर एका गावाहून दुसर्‍या गावी आणि तिथून पुन्हा पहील्या गावी प्रवाश्यांना सोडतो..  तसाच "मी नित्यक्रमाच्या वाहनातून सकाळच्या गावापासून रात्रीच्या गावापर्यंत आणि तिथून पुन्हा सकाळच्या गावापर्यंत आयुष्य नावाच्या प्रवाश्याला फिरवत असतो"
असो तिथून दहा तारखेपर्यंत पगाराची वाट पहाण्यात आणि त्याचे नियोजन करण्यात दिवस नेहमी प्रमाणे संपून गेले...  पगार झाला..  सगळी बिलं भागवण्यात आणि घरातील साहीत्य आणण्यात चार दिवस गेले..

आता लग्नाला जाण्याची तयारी चालू आहे..
सोबत सौही येणारच होत्या..  पूर्ण नियोजन झाले होते.. सकाळी पहाटे लवकर निघून लग्न आटपून संध्याकाळी परतण्याचे ठरले..
अॉफीसात रितसर सुट्टी टाकली होतीच..
ठरल्याप्रमाणे 17 तारीख उजाडली..  पण अचानक सौंची तब्येत बिघडल्याने त्यांनी येण्यास नकार दिला..
मी पहाटे आवरून 5 वा.  एस्टी स्टँडवर पोहचलो..
घरापासून 5-6 किलो मीटर च्या अंतरावर स्टँड आहे.. आणि तिथे पोहचायला ही वाहनं मुबलक आहेत..
चौकशी नंतर कळाले की पुणे गाडी 5.15 आहे..  खूप दिवसांनी एवढ्या लवकर उठल्याने पहाटे पहाटे भूक लागली होती..  स्टँडबाहेर आलो एका हातगाडीवर पोहे घेतले... आणि उद् भरण चालू केले.....
(तसही मला बाहेर खायला आवडत नाही पण नाइलाजाने कधी कधी बाहेर खातो.. आणखी म्हणजे सांगलीतील गाड्यांवरच्या पोह्यांची चवंचं निराळी..  आणि आठवणी ही भन्नाट.. लग्नाच्या आधी सगळ्या मित्रांची फोनाफोनी रात्री 12-1ला व्हायची आणि आम्ही 10-12 मित्र त्यानंतर पोहे खायला स्टँडवर जमायचो..  कधी कधी पहाटे 3-4 ला  ही हा प्रकार घडला आहे.. कधी कधी कोणा मित्राच्या कार्यक्रमावेळी रात्री घर रंगवता रंगवता..  तर कधी रात्र पाळीमध्ये काम उरकल्यावर आम्ही पोहे खाण्यासाठी पोहचत असू..  गप्पा मारता मारता कधी प्रत्येकी 2-3 प्लेट पोहे हानून व्हायचे ते कळायचं देखिल नाही..
असो ह्या सार्‍या आठवणीच...
 कारण हल्ली 9 नंतर जरी बाहेर पडलो तरी काय काम आहे..  दिवसा करता येत नाहीत का..
मग मी म्हणतो पाय मोकळे करून येतो.. मग उत्तर येत दिवसभर काय पाय बांधलेले असतात..  आणि झिरपिट चालू होते.. म्हणून हल्ली रात्रीच्या वेळी बाहेर जाणे टाळतो..
.
त्या पोह्यांचं नाव जरी काढलं तरी नाकात नुसता खमंग घमघमाट सुटतो..  अहाहा काय ते चविष्ट पोहे..  वरून बारीक शेव आणि कोथिंबीर मारलेली..  सोबत लिंबाची फोड..  आंबट गोड सांबार.....  एकदा पोहे खाणारा माणूस, दुसर्‍या वेळी पोहे न खाता तिथून जाऊच शकत नाही..
ते गाडे आजही तसेच चालू असतात रात्री 11ते सकाळी 8 वाजेपर्यंत..)
.
क्रमशः



_____मनोज भिलारे

No comments:

Post a Comment